Monday, 30 December 2013

२०१३ चा मागोवा

२०१३ हे वर्ष मराठी चित्रपट सृष्टीसाठी content wise आणि commercially दोन्ही बाजूने महत्त्वाचे ठरले. वर्षाची सुरुवात "बालक पालक" सारख्या चित्रपटाने  आपलं नाणं तिकीट घरात खणखणीत वाजवून केली आणि पुढे "दुनियादारी" ने तो वारसा चालवला.

पण वर्षभरात जर ७०-७५ चित्रपट प्रदर्शित होत असतील तर त्यातले अवघे १०-१२ चित्रपट commercially जगतात तर मोजून ३-४ चित्रपट नफा कमावतात. हे खरंतर खूप गंभीर आहे आणि "हि Industry नक्की चालते तरी कशी ?" हा प्रश्न उत्पन्न करणारी हि बाब आहे. पण गेल्या काही वर्षांपासून हे चित्र  सतत बदलतंय..social media आणि television media मुळे प्रेक्षक हळूहळू सिनेमागृहात येतोय हे हि तितकंच खरं. असो..पण मी चित्रपटांना फक्त आणि फक्त content च्याच आधारावर rate करतो.

तर सुरुवात गोडापासून करूया...खालील १० चित्रपट हे मला ह्या वर्षातले सर्वात आवडलेले मराठी चित्रपट: 

Top 10 Marathi Movies of 2013

१) इन्व्हेस्टमेंट
रत्नाकर मतकरी लिखित, दिग्दर्शित "इन्व्हेस्टमेंट" हा चित्रपट मी माझ्या आयुष्यात पाहिलेला सर्वात POWERFUL चित्रपट. हा चित्रपट वास्तविक तर आहेच, पण हा पाहताना आपलं प्रेक्षक म्हणून होणारा भावनिक प्रवास शब्दात न मांडता येणारा आहे. आजच्या materialistic society च्या सणसणीत मुस्काटीत मारणारा हा चित्रपट आहे.

२) आजचा दिवस माझा
प्रशांत-अजित दळवी लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित "आजचा दिवस माझा" हा चित्रपट ह्या वर्षातला मी पाहिलेला सर्वात सुंदर चित्रपट. ह्याच चित्रपटातल्या एका संवादाप्रमाणे कुणीच न जाणाऱ्या दुर्लक्षित मंदिरात दिवा लावण्याइतकाच निर्मळ हा चित्रपट आहे. राजकारणी देखील माणूस असू शकतात हा जगावेगळा ROMANTIC विषय कुलकर्ण्यांनी सुंदर रित्या हाताळाय.

३) बालक पालक 
रवी जाधव दिग्दर्शित "बालक पालक " एका एकांकीकेवर आधारित हा चित्रपट लोकांनी अक्षरशः उचलून घेतला आणि महाराष्ट्र भर याने कल्ला केला. एका अत्यंत BOLD विषयावर हा चित्रपट असला तरी ह्याची treatment हि trademark रवी जाधव style ची होती. रवी जाधव येत्या काही वर्षात दिग्दर्शक म्हणून एका वेगळ्याच उंचीवर असतील ह्यात काहीच शंका नाही. अडगळीत टाकलेले housefull चे boards single screen सिनेमागृहांच्या मालकांना शोधायला ह्या चित्रपटाने भाग पाडलं. 

४) नारबाची वाडी
गुरु ठाकूर लिखित आणि आदित्य सरपोतदार दिग्दर्शित "नारबाची वाडी" हा चित्रपट मूळ बंगाली कथेवर आधारित असला तरी, माझ्या मते कोकणातल्या अस्सल लाल मातीतल्या माणसांची मजा पहिल्यांदाच चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली.

५) ७२ मैल
राजीव पाटील आज आपल्यात नसले तरी जाताजाता "७२ मैल" हा आमच्या स्मरणात कायमचा राहील असा चित्रपट ते बनवून गेले. वास्तविकतेला cinematic दृष्टीकोन मिळाला कि प्रेक्षक त्याच्या प्रेमात पडतोच हे राजीव पाटील यांनी अनेक वेळा सिद्ध केलंय जे ते ह्या चित्रपटातून हि करतात.

६) संहिता
सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर ह्या जोडीचा "संहिता" हा चित्रपट एखाद्या कवितेसारखा सादर केलेला आहे. ह्या जोडीने अनेक वर्षांपासून जी मनापासून चित्रपट बनवण्याची परंपरा चालवलीय, ती ह्या चित्रपटाने आणखी पुढे न्हेलीय.

७) अनुमती
गजेंद्र अहिरे दिग्दर्शित "अनुमती" हा चित्रपट पाहताना तुमच्या मनात ACIDITY झालीच पाहिजे. म्हातारपण माणसाचं दुसरं बालपण असतं असं म्हणतात, पण ते फक्त परीकथेत असावं असं हा चित्रपट बघितल्यावर वाटतं.

८) चिंटू २
श्रीरंग गोडबोले यांचा "चिंटू २" हा चित्रपट म्हणजे खराखुरा बालचित्रपट. फारसी तामझाम नसून, महागडे vfx नसूनही एक चांगला adventurous चित्रपट बनवला जाऊ शकतो हे गोडबोल्यांनी सिद्ध केलंय.

९) प्रेमाची गोष्ट
वर्षाच्या सुरुवातीला आलेला हा सतीश राजवाडे यांचा "प्रेमाची गोष्ट" हा चित्रपट म्हणजे साधी, सरळ, सोप्पी पण सुंदर अशी प्रेम कहाणी. ह्या गोष्टीत ती दोघं प्रेमात कशी पडतात हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे जो अनेक lovestorys मधून सोयीस्कर रित्या वगळला जातो.

१०) पुणे ५२
उमेश विनायक कुलकर्णी यांची निर्मिती असलेला आणि नवोदित पण कर्तबगार दिग्दर्शक निखील महाजन यांचा "पुणे ५२" हा चित्रपट एका विशिष्ट वैचारिक ठेवण असलेल्यांसाठीच आहे असं काही नाही. महाजनांच्या दिग्दर्शनात हलकी हलकी "Master of Suspense" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या थोर दिग्दर्शक Alfred Hitchcock यांची छाप आढळून येते.

 

ह्या १० मध्ये नसलेले पण प्रेक्षकांना आणि मलाही आवडलेले ह्या वर्षातले हे मी निवडलेले ८ चित्रपट:

Notable Omissions

१) टाईम प्लीज
लग्नानंतर जोडप्यांच्या आयुष्यात येणारे बदल आणि त्यातून होणारे गैरसमज अश्या theme वर आधारित हा चित्रपट होता. एका नाटकाचा हा remake असला तरी ह्यात सिनेमा होता असं म्हणायला हरकत नाही.

२) दुनियादारी
ह्या चित्रपटाबद्दल काहीच बोलण्याची गरज नाही कारण जर तुम्ही मराठी प्रेक्षक आहात आणि हा चित्रपट आवडला नाही असं होणारच नाही.

३) तेंडूलकर आऊट
खरंतर क्रिकेटचा या कथेशी फारसा संबंध नव्हता पण पटकथाकार आणि दिग्दर्शक यांनी केलेला हा क्रिकेटमय प्रयोग वेगळा आणि मनोरंजन करणारा होता.

४) पोपट
खूप महत्त्वाचा असा एक social message ह्या चित्रपटात होता पण त्याचा वापर promotion साठी न करता लोकांना तो थेट सिनेमागृहात सिनेमाच्याच माध्यमातून cinematically दिला गेला.

५) खो खो
केदार शिंदेचा नवा खेळ म्हणून ह्याचं promotion केलं गेलं होतं. आता केदार शिंदेच्या चित्रपटातले लोकांना आवडणारे आणि समीक्षकांना न आवडणारे सगळे elements ह्यात होते. 

६) पितृऋण
एका कन्नड कादंबरीवर आधारित हा चित्रपट आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत खुर्चीवर चिकटून ठेवतो. दिग्दर्शन जरी सामान्य दर्ज्याचं असलं तरी कथेच्या जोरावर हा चित्रपट आपण आपल्याबरोबर घेऊन जातो.

७) तुह्या धर्म कोंचा
धर्म ह्या विषयावर चित्रपट बनवणं म्हणजे आपल्या देशात खूप मोठं धाडसच आहे. चित्रपट अगदी प्रमाणिकपाने बनवलेला होता पण थोड्याफार प्रमाणात तो फसला असला तरी चित्रपटातलं वेगळेपण कौतुकास्पद आहे.

८) रामचंद्र पुरषोत्तम जोशी
अनेक वर्ष रखडलेला हा चित्रपट ह्या वर्षी अखेर प्रेक्षांच्या भेटीला आला. fantasy ह्या genre खूप कमी चित्रपट आपल्याकडे होतात त्यामुळे हे दिग्दर्शकाने केलेलं धाडसच होतं.

 

शेवट गोड नसावा असं माझं तत्व असल्यामुळे ह्या वर्षी जे काही माझा भ्रमनिरास करणारे चित्रपट होते त्यातले हे निवडक चित्रपट.
म्हणजे "नाव मोठं लक्षण खोटं" type चे:

Notable Disasters

१) जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा
"झेंडा" आणि  "मोरया" नंतर अवधूत गुप्तेचा हा चित्रपट म्हणजे त्याची आधीची पुण्याई विसरवणारा होता. निलेश मोहरीरचं संगीत वगळता काहीच लक्ष्यात राहत नाही हा चित्रपट बघून झाल्यावर.

२) मंगलाष्टक वन्स मोअर
टाईम प्लीज ह्या काही महिन्यांआधीच आलेल्या चित्रपटाशी असलेलं साम्य तर खटकतच पण दोन अत्यंत गुणी कलाकार waste केल्या सारखे वाटतात. इथेही निलेश मोहरीरचं संगीतच तारणहार ठरतं. आता संपूर्ण स्वप्नील-मुक्ता fanclub साठी हा चित्रपट चांगलाच होता, पण वर्षभरात(आयुष्यभरात) इतके चांगले चित्रपट बघणाऱ्यांना हा चित्रपट पसंती पडणं कठीणच.

३) टूरींग टॉकीज
काही दिवसांपूर्वीच बातमी ऐकली कि हा चित्रपट यंदा oscar च्या शर्यतीत आहे. oscar च्या शर्यतीत कुठलाही भारतीय चित्रपट असला तर मला आनंदच आहे पण ह्या वर्षी अनेक deserving options होते कि मग हाच का? देव बेनेगल दिग्दर्शित "Road Movie" ह्या काही वर्षांपूर्वी आलेल्या हिंदी चित्रपटाशी असलेलं साम्य किती easily ignore केलं गेलं. असो पण त्यापेक्षा मोठी खटकणारी बाब म्हणजे ह्या चित्रपटाने महाराष्ट्रातल्या तंबू चित्रपट संस्कृतीचा चा सरळ सरळ अपमान केलाय. निर्माती तृप्ती भोईर आणि दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांच्या मते महारष्ट्राच्या गावोगावी भरणाऱ्या तंबूत फक्त पांचट आणि अश्लील चित्रपट लोकांना आवडतात जे अजिबात खरं नाही. खरंतर कमी budget मध्ये बनणारे cinematically अर्थशून्य असे कौटुंबिक चित्रपट हे तंबू सिनेमांची जान आहेत जे आधी एका documentry मधेही दाखवलं होतं.

४) कोकणस्थ
महेश मांजरेकर यांनी गेल्यावर्षी "काकस्पर्ष" हा चित्रपट बनवून प्रेक्षकांची मनं जिंकली होती. पण त्यानंतर आधी "कुटुंब" आणि आता "कोकणस्थ" असे एका पाठोपाठ एक दोन वायफळ चित्रपट बनवले. त्यांच्याच 'विरुद्ध" ह्या हिंदी चित्रपटाचा उगाचच केलेला हा remake कुणाच्याच पचनी पडला नाही.

५) झपाटलेला २
मराठीतला पहिला 3D चित्रपट म्हणून याचं promotion केलं गेलं होतं. पण महागडे VFX, सुंदर कंबर हलवणारी नटी, चिकना नट आणि भूतकाळातली पुण्याई चित्रपट चांगला असण्यासाठी पुरेशी नसते हे परत एकदा सिद्ध झालंय.


 ६) वी आर ऑन होऊन जाऊ द्या
तेंडूलकर देखील कधी कधी शून्यावर बाद होतो ना! मग अमोल पालेकर सुद्धा एखादा अर्थशून्य चित्रपट बनवू शकतात कि! ते सुद्धा इतक्या मोठ्या, जाणत्या आणि गुणी कलाकारांना सोबत घेऊन. सिनेमा ह्या माध्यमातली uncertainty ह्या गोष्टीतून कळून येते.!!

तर २०१३ ला आता निरोप देणार आहोत आपण सारे पण २०१४ मध्ये येणारे मराठी चित्रपट आतापासूनच आपल्याला उत्सुक करत्यात. रवी जाधव दिग्दर्शित "टाईम पास" २०१४ च्या पहिल्याच आठवड्यात येतोय तर पुढे सुजय दहाके दिग्दर्शित "आजोबा", नागराज मंजुळे दिग्दर्शित "फॅंड्री", अभिजित पाणसे दिग्दर्शित "रेगे"आणि शिवाजी पाटील दिग्दर्शित "धग" ह्या सगळ्यांबद्दल भयंकर उत्सुकता आहेच!!!

 

 


Tuesday, 2 July 2013

दुःखाचा व्यापारी

ऐका ऐका इथे लक्ष द्या

दादा, काका, मावशी, आत्या सगळे या

विकण्यास आणले मी नवे, कोरे, ताजे 'दुःख'

आधी सहन करा मग मोबदला द्या 

जर जालीम नाही निघाले तर

एकाच्या किमतीत दोन घ्या

किंमत मात्र ‘सुख’ तुमचे

एक सुख द्या अनेक दुःख घ्या

मानसिक घ्या, शाररीक घ्या

खास सवलतीत ‘वेदना’ घ्या

मनःशांतीच्या मोबदल्यात

अपराधीपणा घ्या

तुमच्या एक एक हसऱ्या क्षणांवर

त्यांच्या दुप्पट अश्रू घ्या

एकदा घ्याल कायमचे खपाल

हाथ पाय गळून टाहो फोडत बसाल

आशेच्या एखाद्या किरणेच्या बदल्यात

हरवलेला आत्मविश्वास घ्या

माणसांच्या प्रेमाच्या बदल्यात

त्यांचा द्वेष घ्या

देण्यास तुमच्याकडे सुख नसले तरी चालेल

तुमच्या त्या शिळ्या दुःखाच्या बदल्यात

आमचे नवे, कोरे, ताजे ‘दुःख’ घ्या....


- अभय आनंद साळवी



  

Monday, 10 June 2013

पाऊस आल्यावर...


पाऊस आल्यावर सगळ्यांना कविता होतात
त्याला तिच्या आणि तिला त्याच्या कळा येतात

ह्यांच्या भावनांचे बांधच फुटतात
२ BHK च्या भिंती तोडून अनावर धावतात

कधी पाखरू कधी काजवे होतात
तर कधी पहाटेचा गारठा होतात

मक्याची कणसं, कांद्याच्या भज्या होतात
कधी सागरी किनार्याच्या बेभान लाटा होतात

चिंब भिजून भावना साऱ्या देहाशी परततात
कोमेजलेल्या मनाला मग नवे सूर गवसतात

दरवर्षी पावसाळ्यात अशेच अनेक कविराज उमलतात
आणि आसपासच्या दुष्काळावर बारीकसा आघात करतात


- अभय आनंद साळवी

Saturday, 4 May 2013

आमच्यातलाच ‘हा’

(या कवितेतला ‘हा’ म्हणजे कुठल्याही धर्मपरायण, श्रद्धावान, सात्विक इत्यादी माणसाच्या खोल आत दडपून ठेवलेला एक बंडखोर नास्तिक )

ह्या नास्तीकाची मिजास लय भारी
धर्मापेक्षा ह्याला ह्याची तत्व न्यारी

भाकडकथा म्हणतो सगळ्या
म्हणे सिद्ध करून देता का सह्या

आला मोठा निर्भीड स्पष्टवक्ता 
म्हणे दगडाच्या कश्यास पाया पडता

धार्मिक कार्याला म्हणतो धंदा
आणि आमच्या गुरुदेवांना म्हणतो भामटा

पण आम्ही बुवा भलतेच अध्यात्मिक
VIP लाईनीतूनच होतो सात्विक

वर्गण्या देतो हजारोंच्या
जश्या फिया भरतो पोरांच्या

सोयर सुतकांचे आम्ही पाळकरी
आता त्यांच्या मागून घातल्या शिव्या जरी

संकटात दोष देतो आम्ही देवाला
शेवटी केलेल्या Investment चा Interest नको का मिळायला

- अभय आनंद साळवी

Friday, 26 April 2013

तो, ती आणि उन्हाळा...


तो म्हणतो ....

आज फुलला चंद्रमा हा
पाहुनी चंद्रास माझ्या
सौख्यं त्यास वाटले कि
आता लाभेल त्यास विसावा

भुलल्या साऱ्या कळ्या हि
जेव्हा दरवळला सुवास तुझा
बरसेल बघ आज गर्जून
उन्हाळ्यात तो ढग खुळा

निरखुनि मज आज पाहू दे
निसर्गाची हि कला
ये जरा जवळी असा
लाजऱ्या माझ्या फुला

ती म्हणते...

ऐन उन्हाळ्यात तुजला
हा कुठला नाद गवसला
छळू नकोस मज आज सख्या
बघ चुलीवरचा भात लागला

(ओतीन रंगात रंग
मेल्या पावसाळ्यात तुझ्या)..मनात
चिंब भिजली घामाने हि
तुलसीदासा तुझी प्रिया

(वास नुसता वास येतो
मेल्या दारूचा तुझ्या)..मनात
रागवू नकोस सख्या
फक्त २ महिन्यांचा दुरावा

तो म्हणतो....(मनातच)

(कर्म माझं चंद्र म्हटलो
माझ्या ह्या धुसक्या म्हशीला)
(फुल कसली हि तर
Flower Potच सारा)

(जोश्या साल्या म्हटला होतास
कवितांनी भाळतात ह्या)
(आता २ महिने वाट पाहू 
भावखाऊ पावसाची त्या)

-अभय आनंद साळवी 

कधी तरी हरुनही पाहा..!!

कधी कधी वाटतं बास....आता ढोपरे टेकावी
लढण्यासाठी बळ तर आहे..पण इच्छा नाही

जिंकल्यावरही सुख काय मिळणार नाही
फक्त दुसऱ्याला हरवण्यासाठी जिंकावं का ?

त्यापेक्षा समाधानाने हरणं पत्करावं
निदान दुसऱ्याच्या जिंकण्याचं सुख तरी मिळतं !

म्हणून म्हणतो कधी तरी हरूनही पाहा
हातातला डाव निसटून जाऊ द्या..

कारण हर एक डाव जिंकणारा
आयुष्यात जिंकतोच असं नाही

पण आयुष्यात जिंकणाऱ्यानी..
असा एखादा डाव हरलेला असतोच..!!

-अभय आनंद साळवी

IPL गाथा


पैश्याचा हा खेळ मांडला
खेळ यातला कधीच हरवला

लागल्या बोल्या, विकल्या निष्ठा
बाजार इथला भारीच भरला

भलत्याच जागृत ह्यांच्या संवेदना
उराला धरला फाटका पंचा

चंद्र तारे सारेच आलेत
रंगीत रंगांच्या प्रयोगाला

वाहत गेले सारेच भोळे
मदहोश झाला आसमंत सारा

श्वास रोखुनी पाहती सगळे
आधीच ठरलेला सामना

सूर कश्याला ? ताल कश्याला ?
भान हरपले नुसत्या हैदोसाला

गवसले तसे खूप त्यांना
पण खेळामधला खेळ हरवला....

-अभय आनंद साळवी



जेव्हा एक घर जळतं......


आज मी एक घरटे जळताना पाहिले...
बहुदा माणसाचेच असावे

एरवी घाईत असलेली लोकं 
आज त्याच्या भोवती उभी होती

बहुदा राख होण्याची वाट पाहत असावी
पण आग वाडतच गेली

आग बुजवण्याचे हाथ कोणाचेच नव्हते
हो पण काही सरसावले पाणी घेऊन

पण ते पाण्याच्या आवरणात तेलच होते
बघता बघता होत्याचे नव्हते झाले

कालचे आनंदवन एका क्षणात स्मशान झाले
बघणारे मात्र चेहऱ्यावरच्या सुरकुत्याही न हलवता चालते झाले !

-
अभय आनंद साळवी