Friday, 26 April 2013

तो, ती आणि उन्हाळा...


तो म्हणतो ....

आज फुलला चंद्रमा हा
पाहुनी चंद्रास माझ्या
सौख्यं त्यास वाटले कि
आता लाभेल त्यास विसावा

भुलल्या साऱ्या कळ्या हि
जेव्हा दरवळला सुवास तुझा
बरसेल बघ आज गर्जून
उन्हाळ्यात तो ढग खुळा

निरखुनि मज आज पाहू दे
निसर्गाची हि कला
ये जरा जवळी असा
लाजऱ्या माझ्या फुला

ती म्हणते...

ऐन उन्हाळ्यात तुजला
हा कुठला नाद गवसला
छळू नकोस मज आज सख्या
बघ चुलीवरचा भात लागला

(ओतीन रंगात रंग
मेल्या पावसाळ्यात तुझ्या)..मनात
चिंब भिजली घामाने हि
तुलसीदासा तुझी प्रिया

(वास नुसता वास येतो
मेल्या दारूचा तुझ्या)..मनात
रागवू नकोस सख्या
फक्त २ महिन्यांचा दुरावा

तो म्हणतो....(मनातच)

(कर्म माझं चंद्र म्हटलो
माझ्या ह्या धुसक्या म्हशीला)
(फुल कसली हि तर
Flower Potच सारा)

(जोश्या साल्या म्हटला होतास
कवितांनी भाळतात ह्या)
(आता २ महिने वाट पाहू 
भावखाऊ पावसाची त्या)

-अभय आनंद साळवी 

कधी तरी हरुनही पाहा..!!

कधी कधी वाटतं बास....आता ढोपरे टेकावी
लढण्यासाठी बळ तर आहे..पण इच्छा नाही

जिंकल्यावरही सुख काय मिळणार नाही
फक्त दुसऱ्याला हरवण्यासाठी जिंकावं का ?

त्यापेक्षा समाधानाने हरणं पत्करावं
निदान दुसऱ्याच्या जिंकण्याचं सुख तरी मिळतं !

म्हणून म्हणतो कधी तरी हरूनही पाहा
हातातला डाव निसटून जाऊ द्या..

कारण हर एक डाव जिंकणारा
आयुष्यात जिंकतोच असं नाही

पण आयुष्यात जिंकणाऱ्यानी..
असा एखादा डाव हरलेला असतोच..!!

-अभय आनंद साळवी

IPL गाथा


पैश्याचा हा खेळ मांडला
खेळ यातला कधीच हरवला

लागल्या बोल्या, विकल्या निष्ठा
बाजार इथला भारीच भरला

भलत्याच जागृत ह्यांच्या संवेदना
उराला धरला फाटका पंचा

चंद्र तारे सारेच आलेत
रंगीत रंगांच्या प्रयोगाला

वाहत गेले सारेच भोळे
मदहोश झाला आसमंत सारा

श्वास रोखुनी पाहती सगळे
आधीच ठरलेला सामना

सूर कश्याला ? ताल कश्याला ?
भान हरपले नुसत्या हैदोसाला

गवसले तसे खूप त्यांना
पण खेळामधला खेळ हरवला....

-अभय आनंद साळवी



जेव्हा एक घर जळतं......


आज मी एक घरटे जळताना पाहिले...
बहुदा माणसाचेच असावे

एरवी घाईत असलेली लोकं 
आज त्याच्या भोवती उभी होती

बहुदा राख होण्याची वाट पाहत असावी
पण आग वाडतच गेली

आग बुजवण्याचे हाथ कोणाचेच नव्हते
हो पण काही सरसावले पाणी घेऊन

पण ते पाण्याच्या आवरणात तेलच होते
बघता बघता होत्याचे नव्हते झाले

कालचे आनंदवन एका क्षणात स्मशान झाले
बघणारे मात्र चेहऱ्यावरच्या सुरकुत्याही न हलवता चालते झाले !

-
अभय आनंद साळवी