Thursday, 22 May 2014

Top 10 Marathi Movie Characters of All Time

किव्वा
मराठी चित्रपटातल्या माझ्या सर्वात आवडत्या १० व्यक्तिरेखा

इथे लेखक आणि दिग्दर्शकांनी रेखाटलेल्या व्यक्तिरेखेबद्दल आपण बोलत असलो तरी, ती व्यक्तिरेखा साकारणारा कलाकार हि तितकाच महत्त्वाचा हे विसरून चालणार नाही !!

 

१०) प्राची (चित्रपट: इन्व्हेस्टमेंट, २०१३)

  रत्नाकर मतकरी लिखित आणि दिग्दर्शित "इन्व्हेस्टमेंट" या चित्रपटातली प्राची हि 'आई' या शब्दाच्या आपल्याला ज्ञात असलेल्या सगळ्या परिभाषा बदलते. सुप्रिया विनोद नी साकारलेली हि भूमिका आजच्या धावत्या जगाचं प्रतिनिधित्व करते. आपल्या मुलाला राजकारणी बनवायचं असं ठरवून त्याच्यावर तसेच संस्कार ती करते. मग त्याने आपल्याच वर्गातल्या मुलीचा खून केला असला, तरी त्याच्या मागे खंबीरपणे(वेगळ्या अर्थाने) उभी राहते. एकीकडे अशी आई कधीच चित्रपटात दिसली नव्हती आणि तिचा प्रत्येक गुण आपल्याला आश्चर्याचा धक्का देत असला तरी तिचं वागणं बोलणं हे ओळखीचं वाटतं !
        आपल्या मुलांमध्ये आणि त्यांच्या प्रत्येक पापावर पांघरून घालून आपण खरंतर "इन्व्हेस्टमेंट" करतो हे सिद्ध करणारी थोर आई आपल्या मनावर कायमचा आघात करून जाते.  

 

 

९) नच्या दादा (चित्रपट: विहीर, २०१०)

  गिरीश आणि उमेश कुलकर्णी यांचा विहीर हा चित्रपट सगळ्याच अंगाने विलक्षण आहे. पण या चित्रपटाचा जीव नच्या दादा या व्यक्तिरेखेत आहे. आलोक राजवाडे या अत्यंत गुणी अभिनेत्याने साकारलेला नचिकेत चित्रपट बघितल्यावर मनातून जातच नाही. चित्रपटाचा नायक खरंतर त्याचा मावस भाऊ 'सम्या' ज्याचा त्याच्या नच्या दादावर खूप जीव आहे. नच्या प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करतो, त्याच्या घरातल्यांचा, मित्रांचा एकंदरीत आयुष्याचा. संसारात गुंतणं नच्याला कठीण वाटतं. दूर पळून जावसं वाटतं. त्या वयात(१४-१६) विचार करणाऱ्या प्रत्येक माणसाला अशे अनुभव येतात. ते अनुभव आपण नच्याच्या रुपात जगतो.
         प्रेक्षक म्हणून आपण नच्याच्या मरणाने तितकेच अस्वस्थ होतो जितका सम्या होतो. कारण अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला तेव्हा सापडत नाहीत पण चित्रपट संपल्यावर सापडतात !

 

 

८) फाळके (चित्रपट: हरिश्चंद्राची फॅक्टरी, २००९)

  "राजा हरिश्चंद्र" या पहिल्या भारतीय चित्रपटामागची धडपड दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी गमतीशीर रित्या या चित्रपटातून दाखावली. दादासाहेब फाळके यांचं व्यक्तिमत्व मोकाशी यांनी काही वास्तविक तर काही त्यांच्या नुसार रेखाटलं. खरे फाळके कसे होते हे कुणालाच ठामपणे सांगता येणार नाही पण त्यांनी केलेल्या कार्यातून त्यांचं जे चित्र आपल्यासमोर येतं ते मोकाशींनी रेखाटलेल्या चित्रासारखच. नंदू माधव यांनी या भूमिकेत अगदी सहजपणे केलेला वावर या व्यक्तिरेखेला चार चांद लावतो.
        प्रोफेसर 'केळ्फा' यांचे कारनामे अनेकदा बघून सुद्धा पुन्हा पुन्हा बघावेसे वाटतात !! 

 

 

७) अवली (चित्रपट: संत तुकाराम, १९३६)

  निष्कारण देवदासच्या नावाचा दिवा जपणाऱ्या पारोपेक्षा तुकोबांना येडं म्हणणाऱ्या अवलेचं प्रेम मला जास्त खरं वाटतं ! गौरी या अभिनेत्रीने साकारलेली जिजाई किव्वा अवली म्हणजे भारतीय चित्रपटांच्या इतिहासातली सर्वात वेगळी आणि खमकी बायको..! तुकोबांवर फडाफडा डाफरणारी पण तरीसुद्धा तुकोबांवर जिवापार प्रेम करणारी हि त्यांची बायको विष्णुपंत पागनीस यांच्या तुकोबांच्या व्यक्तिरेखेपेक्षा मला जास्त प्रभावी वाटते.

 

 

६) श्यामची आई (चित्रपट: श्यामची आई, १९५३)

  सानेगुरुजींच्या "श्यामची आई" या पुस्तकावर प्र. के. अत्रे यांनी बनवलेला हा चित्रपट म्हणजे मराठी चित्रपटाची खरी ओळख. आईची माया आणि तिचे संस्कार इतक्या सुंदर रित्या कधीच चित्रपटात दिसले नसावे. वनमाला पवार यांनी साकारलेली आई हे आपल्या संस्कृतीचं प्रतिक आहे. कुठल्याही माणसाला घडवण्यात त्याच्या आईचाच सर्वात मोठा हाथ असतो, हि बाब हा चित्रपट बघितल्यावर अगदी तंतोतंत पटते.

 

 

 ५) मास्तर (चित्रपट: पिंजरा, १९७२)

  व्ही. शांताराम यांचा "पिंजरा" हा चित्रपट भारतीय चित्रपट सृष्टीत दोन गोष्टींमुळे मैलाचा दगड ठरला, एक त्यातल्या लावण्या आणि दोन म्हणजे श्रीराम लागू यांचा अभिनय. गावाच्या विकासाठी आयुष्य देणारा मास्तर पुढे एका नाचणाऱ्या बाईच्या प्रेमात पडतो आणि मग कसा खडतर प्रवास त्याला करावा लागतो हे आपण ह्या चित्रपटात बघतो. मास्तर ह्या व्यक्तिरेखेचा हा विलक्षण प्रवास लागूंनी अतिशय सहजपणे दाखवला.

 

 

४) तुकाराम (चित्रपट: तुकाराम, २०१२)

 १९३६ मध्ये आलेल्या संत तुकारामा या चित्रपटातल्या संत तुकाराम पेक्षा चंद्रकांत कुलकर्णींच्या "तुकाराम" या चित्रपटातला जितेंद्र जोशी ने साकारलेला तुकोबा मला जास्त आवडतो. कारण हा तुक्या जादूचे खेळ न करता लोकांना जगण्याची खरी दिशा दाखवतो. हा देवाला मित्र मानतो आणि वेळ पडली तर त्याच्याशी भांडतो देखील. खरे तुकोबा आपल्याला ह्या चित्रपटातूनच भेटले. विठ्ठलाचा लळा त्यांना बालपणीच होता, पण घराच्या सगळ्या जवाबदार्या सांभाळत पुढे ते विठ्ठलाची भक्ती करू लागले. चित्रपटात दाखवलेला दुष्काळ आपल्याला तुकोबांची खरी कहाणी सांगतो. तो दुष्काळ तुकोबांना आणि आपल्याला अंतिम सत्य काय ह्याची प्रचीती हि आणतो.

 

 

३) वासुदेव बळवंत ठोंबरे (चित्रपट: रात्र आरंभ, १९९९)

 "स्क्रीझोफेनिया" या मानसिक आजाराच्या रुग्णाची भूमिका दिलीप प्रभावळकर यांनी या चित्रपटात साकारली. प्रभाकर फडके हे रिटायर्ड झालेले, साठी ओलांडलेले ज्यांना लेखनाची आवड. ते एक कादंबरी लिहतात ज्याच्यात स्वतःला श्रीमंत आंधळे उद्योगपती "वासुदेव बळवंत ठोंबरे" ह्या पात्रात पाहतात. काही काळानंतर ते स्वतःच ठोंबरे म्हणून वावरू लागतात. आपली नालायक मुलं इस्टेटीसाठी आपल्याला मारत्यात असं त्यांना वाटू लागतं आणि तेव्हा सावतःच्या खऱ्या मुलाला ते मारून टाकतात. २००२च्या ऑस्कर शर्यतीत जिंकलेला एक इंग्रजी चित्रपट होता ज्याच्यात "रस्सल क्रो" ह्याने हि एका  स्क्रीझोफेनिक रुग्णाची भूमिका केलेली, पण माझ्या मते प्रभावळकरांचं काम हे क्रो पेक्षा हि उत्कृष्ट झालेलं !!

 

 

२) मास्तर (चित्रपट: सामना, १९७५)

  विजय तेंडूलकर लिखित आणि जब्बार पटेल दिग्दर्शित सामना हा चित्रपट म्हणजे मराठी आणि भारतीय चित्रपटाला सर्वात मोठा मैलाचा दगड. श्रीराम लागू यांचा मास्तर हा म्हटलं तर गांधीवादी, म्हटलं तर दारुवादी. त्यंच्या भूतकाळात असं काही तरी घडून गेलं असावं कि ज्याने वाटतं कि एकेकाळी हा माणूस समाज बदलू पाहणारा होता, पण आता हा फक्त रस्तोरस्ती फिरणारा एक दारुड्या. हिंदुराव साहेब त्याला आसरा देतात, पण त्याच्या उलट हा नको नको ते प्रश्न विचारतो आणि साहेबांना हैराण करतो. जगाच्या पाठीवर फक्त एकच नट हि भूमिका करू शकतो आणि ते म्हणजे खुद्द लागूच असं पक्का विश्वास हा चित्रपट पाहिलेल्या प्रत्येकालाच आहे.

  

 

१) हिंदुराव धोंडे पाटील (चित्रपट: सामना, १९७५)

 मास्तर ज्या साहेबांना हैराण करतात ते हेच, हिंदुराव धोंडे पाटील. मराठी चित्रपटातला सर्वात लखलखता तारा म्हणजे निळूभाऊ, आणि त्यांच्या आयुष्यातली सर्वात विलक्षण व्यक्तिरेखा हीच. एक पुढारी ज्याने त्याच्या विभागाचा विकास केला, ज्या गावात माणूस आणि कुत्रं एकाच भाकरीसाठी भांडत होते, तिथल्या लोकांना स्वतःची भाकर दिली. पण असा विकास करण्यासाठी एखाद्या मारुती कांबळेला कायमचा उपटून काढावा लागतो. हिंदुरावांना सत्ता हवी असते, पण लोकांचं मन हि जिंकायचं असतं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागात असा एक हिंदुराव असतोच अजूनही आहे. निळू फुले यांनी अनेक इरसाल खलनायक चित्रपटात साकारले, पण हिंदुराव फक्त खलनायक नव्हता आणि फिल्मी तर अजिबात नव्हता. तेंडूलकर आणि पटेल यांच्या मते मास्तर हि व्यक्तिरेखा जास्त वर्चड होती, पण निळूभाऊंनी त्यांच्या भूमिकेत इतका जीव ओतला कि आपण आज मास्तर कि हिंदुराव या पेचात पडलो. माझ्यासाठी तरी हिंदुराव मास्तरांपेक्षा एक पैसा सरस...!!

 

 

तर मराठी चित्रपटातले ह्या माझ्या सर्वात आवडत्या १० व्यक्तिरेखा...!!!

No comments:

Post a Comment