Tuesday, 2 July 2013

दुःखाचा व्यापारी

ऐका ऐका इथे लक्ष द्या

दादा, काका, मावशी, आत्या सगळे या

विकण्यास आणले मी नवे, कोरे, ताजे 'दुःख'

आधी सहन करा मग मोबदला द्या 

जर जालीम नाही निघाले तर

एकाच्या किमतीत दोन घ्या

किंमत मात्र ‘सुख’ तुमचे

एक सुख द्या अनेक दुःख घ्या

मानसिक घ्या, शाररीक घ्या

खास सवलतीत ‘वेदना’ घ्या

मनःशांतीच्या मोबदल्यात

अपराधीपणा घ्या

तुमच्या एक एक हसऱ्या क्षणांवर

त्यांच्या दुप्पट अश्रू घ्या

एकदा घ्याल कायमचे खपाल

हाथ पाय गळून टाहो फोडत बसाल

आशेच्या एखाद्या किरणेच्या बदल्यात

हरवलेला आत्मविश्वास घ्या

माणसांच्या प्रेमाच्या बदल्यात

त्यांचा द्वेष घ्या

देण्यास तुमच्याकडे सुख नसले तरी चालेल

तुमच्या त्या शिळ्या दुःखाच्या बदल्यात

आमचे नवे, कोरे, ताजे ‘दुःख’ घ्या....


- अभय आनंद साळवी