पाऊस आल्यावर सगळ्यांना कविता होतात
त्याला तिच्या आणि तिला त्याच्या कळा येतात
ह्यांच्या भावनांचे बांधच फुटतात
२ BHK च्या भिंती तोडून अनावर धावतात
कधी पाखरू कधी काजवे होतात
तर कधी पहाटेचा गारठा होतात
मक्याची कणसं, कांद्याच्या भज्या होतात
कधी सागरी किनार्याच्या बेभान लाटा होतात
चिंब भिजून भावना साऱ्या देहाशी परततात
कोमेजलेल्या मनाला मग नवे सूर गवसतात
दरवर्षी पावसाळ्यात अशेच अनेक कविराज उमलतात
आणि आसपासच्या दुष्काळावर बारीकसा आघात करतात
- अभय आनंद साळवी